अकोला जिल्ह्याविषयी
अकोला जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या मध्य पूर्वेकडे वसलेला आहे. हा जिल्हा उत्तर अक्षांश 20.17 ते 21.16 आणि पूर्व रेखांश 76.7 ते 77.4 चे दरम्यान वसलेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेला गाविलगडचे डोंगर असून पूर्वेकडे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव, दर्यापूर व नांदगाव खंडेश्वर तहसील व वाशीम जिल्ह्यातील कारंजा तहसील आहे. दक्षिण बाजूला वाशिम जिल्हा आणि पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे. अकोला जिल्हाचे क्षेत्रफळ 5428 चौ.कि.मी. असून ते महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या 1.76% आहे. अकोला जिल्ह्यामध्ये अकोला तहसीलचे क्षेत्रफळ सर्वात जास्त म्हणजे 1134.13 चौ.कि.मी. असून तेल्हारा तहसीलचे क्षेत्रफळ सर्वात कमी म्हणजे 628 चौ.कि.मी. आहे.